माझ्यावर पीएच.डी. करायला दहा-बारा वर्षे लागतील!

शरद पवार यांचा चंद्रकांत पाटील यांना टोला



___ मुंबई, दि. २३ (प्रतिनिधी) - माझ्यावर पीएच.डी. करायला चंद्रकांत पाटील यांना किमान दहा-बारा वर्षे लागतील, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधताना शरद पवार यांनी आज आपले महाविद्यालयीन जीवन, राजकारण आणि समाजकारण याविषयावर तरुणाईशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. ___ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर मला पीएच.डी. करायची आहे असे म्हटले होते. याबद्दल एका विद्यार्थिनीने विचारले असता पवार म्हणाले, एरवी पीएच.डी.साठी दोन वर्षे लागतात, पण पाटलांना माझ्यावर पीएच.डी. करायची असेल तर त्यांना दहा-बारा वर्षे लागतील. पवार यांनी हा टोला हाणताच उपस्थितांमध्ये खसखस पिकली.


महाविद्यालयीन निवडणुका व्हायला हव्यात अभ्यास सोडून मी बाकीच्या सर्व विषयांत पारंगत होतो असे मिश्कीलपणे सांगत निश्चय केला की काहीही मिळवता येते हे लक्षात ठेवा असा सल्लाही पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला. सध्याचा जमाना लक्षात घेतला आणि शैक्षणिक समस्या पाहिल्या तर पालकांनी आपल्या पाल्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नये, असेही ते म्हणाले. महाविद्यालयीन निवडणुका व्हायला हव्यात. लोकशाहीतील निवडणुकीची प्रक्रिया थांबणे योग्य नव्हे. या निवडणुका पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने निर्णय घ्यावा, असेही शरद पवार म्हणाले.