उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन
नवी मुंबई, दि. २३ (प्रतिनिधी) - भाजपच्या चार नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मातोश्री निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. या चारही नगरसेवकांचे उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून स्वागत केले. तुर्भे स्टोअर्समधील सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी, मुद्रिका गवळी आणि संगीता वास्के हे चार नगरसेवक शिवसेनेत दाखल झाल्यामुळे नवी मुंबईत भाजपला मोठे खिंडार पडले असून भाजपचे आमदार गणेश नाईक यांना 'जोर का झटका बसला आहे. सुरेश कुलकर्णी यांच्यासह भाजपच्या चार नगरसेवकांनी आज दुपारी दोन वाजता मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आपल्या हजारो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते विजय नाहटा, नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, मधुकर मुकादम आदी उपस्थित होते. भाजप आणि नाईक कुटुंबाच्या मनमानी कारभारावर सुरेश कुलकर्णी गेल्या अनेक महिन्यांपासून नाराज होते. त्यांच्या छळवणुकीला कंटाळून सोमवारी त्यांच्यासह तुर्भे स्टोअर्समधील चारही नगरसेवकांनी नगरसेवक पदाचा आणि भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवबंधन हातात बांधले. कुलकर्णी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे भाजपच्या गोटात जोरदार खळबळ उडाली आहे.