गोदामाचे टाळे तोडून लाखो रुपयांचे साहित्य लंपास

चोरीचा मुद्देमाल चोरणाऱ्या व खरेदी करणाऱ्यांना अटक



मुंबई- शिवडीच्या दारूखाना परिसरात असलेल्या व्ही ताल कंपनीच्या बंद गोदामाचे टाळे तोडून तीन लाख ५५ हजार रुपयांचे साहित्य चोरी झाल्याचा गुन्हा शिवडी पोलिसांनी उघडकीस आणला. कोणताही दुवा नसताना पोलिसांनी शिताफीने तपास करीत चोरी करणाऱ्यांसह चोरीचा मुद्देमाल विकत घेणायालादेखील बेड्या ठोकल्या.


२९ फेब्रुवारीच्या रात्री दारूखाना येथील कंपनीच्या गोदामाचे टाळे तोडण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पाहिले असता गोदामातील साडेतीन लाखांचे साहित्य चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच वरिष्ठ निरीक्षक कुन्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण मांढरे, अंमलदार अवकीरकर, देठे, कदम, साळुखे, मोरे या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी गोदामातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, पण त्यात कपड्याने अंग झाकून आरोपींनी चोरी केली होती. त्यामुळे आरोपींबाबत काहीच माहिती उपलब्ध होत नव्हती, मात्र तरीदेखील पथकाने तांत्रिक बाबींचा अभ्यास करून खबऱ्यांना कामाला लावले. तेव्हा कुर्ला पश्चिमेला राहणारे नझीर इब्राहिम शेख (३२) आणि दिलीप यादव (२३) यांची नावे समोर आली. या दोघांनी चोरी करून चोरीचा मुद्देमाल कुर्ल्यातील कुतुबमंडली येथील अब्दुल खान (२८) याला विकल्याचे समोर आले. त्यानंतर मग पोलिसांनी अब्दुलच्या मुसक्या आवळून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला.