लोखंडी सळई, फावड्यानेही मारहाण
अलिबाग- अपघात करून पळालेल्या आरोपींच्या शोधासाठी गेलेल्या पोलीस पथकावर सशस्त्र हल्ला केल्याची घटना आज पहाटे माणगाव तालुक्यातील वाढवण गावात घडली. एक महिला व अन्य तिघांनी मिळून लोखंडी सळई, फावड्याने सहाय्यक पोलीस निरीक्षकासह एका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे तीनच्या सुमारास मेक्सिमो व इको कारचा अपघात झाला. घटनेनंतर दोन्ही वाहनचालकांमध्ये वाद झाला. त्यानंतर इकोचालक आपल्या साथीदारांसह घरी पळून गेला. मात्र काही वेळाने गस्तीवर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कावळे व हवालदार टेकाळे तेथे पोहोचले. मेक्सिमो चालकाने घडलेला सर्व प्रकार सांगताच कावळे यांनी तत्काळ त्या दोघांबरोबर आरोपी राहत असलेल्या वाढवण गावात धाव घेतली.
___ अधिकाऱ्याच्या डोक्यात रॉड घातला
आरोपी राहत असलेल्या घराचा दरवाजा पोलिसांनी ठोठावताच एका महिलेस तिघेजण बाहेर आले आणि त्यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. इतकेच नाहीतर एकाने कावळे यांच्या डोक्यात रॉड घातला. अचानक घडलेला हा प्रकार थांबविण्यासाठी हवालदार टेकाळे पुढे झाले असता त्यांनाही फावड्याने बेदम मारहाण केली. ही सर्व हकिकत तत्काळ माणगाव पोलीस ठाण्यात फोनवरून सांगण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला.