कस्टममध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १४० जणांना गंडवले

उरण - कस्टम, एक्साईझमध्ये विविध पदांवर नोकरी लावतो, असे सांगून १४० जणांकडून तब्बल ४८ लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संतोष पाटील असे आरोपीचे नाव असून त्याला नवी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने नोकरीत नियुक्त झाल्याचे बोगस पत्रदेखील अनेकांना दिल्याचे तपासात उघड झाले आहे.


आरोपी संतोष पाटील (४१) पेण तालुक्यातील बळवली येथे राहणारा असून सेंट्रल एक्साईज, कस्टम विभागात विविध पदांवर नोकरी लावतो अशी बतावणी करीत आणि नोकरीचे आमिष दाखवत नातेवाईक, शेजारी व मित्रमंडळी अशा एकूण १३० ते १४० व्यक्तींकडून ४८ लाख रुपये लाटले आहेत. संबंधितांना नोकरी लागल्याबाबत बोगस पत्र, सर्व्हिस बुक, मेडिकल कार्ड आदी कागदपत्रे दिली आहेत. जमा करण्यात आलेली रक्कम घेऊन संतोष मागील चार महिन्यांपासून फरार झाला होता. नवी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या कक्ष-२ च्या पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने त्याला गजाआड केले आहे. त्याच्याकडून आणखी कोणत्याही व्यक्तीची फसवणूक झाली असल्यास संबंधितांनी नवी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या कक्ष-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे व सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. एन.एम. पालमपल्ले यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.